no images were found
स्पार्क फोटोग्राफी प्रदर्शनाचे शिवाजी विद्यापीठात उद्घाटन
कोल्हापूर : (प्रतिनिधी ) शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनामध्ये शनिवारी स्पार्क फोटोग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन सलग आठ दिवस म्हणजे येत्या शनिवार दि. 26 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी खुले असेल.
शिवाजी विद्यापीठामध्ये दीड महिन्यापूर्वी सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी हा अभ्यासक्रम सुरू झाला. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने फिल्डवर जाऊन केलेल्या फोटोग्राफीचे हे प्रदर्शन आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रसंग टिपले आहेत. यातून विद्यार्थ्यांचा कलाविष्कार, संवेदनशीलता, विविध विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसेच त्या पाठीमागचा विचार लक्षात येतो. हे प्रदर्शन पाहण्याची चांगली संधी कोल्हापूरवासियांना आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ. शिर्के यांनी यावेळी केले. फोटोग्राफीचे सहयोगी शिक्षक विराज चव्हाण, अभिजीत गुर्जर, जयसिंग चव्हाण, राहुल शहा यांनी विद्यार्थ्यांना फोटोग्राफी संदर्भात फिल्डवर जाऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या फोटो निवडीमध्येही त्यांनी विशेष योगदान दिले. स्वागत व प्रस्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. यावेळी पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, दिग्दर्शक अनुप जत्राटकर, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. प्रसाद ठाकूर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.