no images were found
जी-20 संकल्पनेवरील रिल्सचे शिवाजी विद्यापीठात सादरीकरण
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागामध्ये जी-20 संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रिल्सचे सादरीकरण झाले. विद्यापीठातील जी-20 उपक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीत हा कार्यक्रम झाला.
जी-20 गटाचे अध्यक्षपद यंदा भारताकडे आहे. या पार्श्वभूमीवर देशभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ प्रशासनाने मास कम्युनिकेशन विभागाकडे जी-20 संकल्पनेवर आधारित रिल्स मेकिंग उपक्रमाची जबाबदारी दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी जी-20 परिषदेच्या विकास मुद्यांना अनुसरून रिल्स तयार केल्या होत्या. शाश्वत विकास उद्दिष्टे, पर्यावरणातील बदल, अन्न सुरक्षा आणि तृणधान्य तसेच भरड धान्य लोकप्रिय करणे, हरित जगाला आकार देणारे ऊर्जा संक्रमण, पर्यावरणातील हरित वाढ, पर्यावरणपूरक जीवनशैली, विकासासाठी डेटाचा उपयोग, साहित्य आणि पर्यावरण यातील सुसंगतता या विषयांवर विद्यार्थ्यांनी 30, 60 व 90 सेंकदांच्या रिल्स तयार केल्या होत्या. या रिल्सचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. रिल्स मेकिंग उपक्रमामध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. पन्हाळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन श्रेया देशमुख हिने तर आभार साई सिमरन घाशी हिने मानले. यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.