no images were found
अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर ओळखीतून फसवणूक
ही अल्पवयीन मुलगी आजरा तालुक्यातील मासेवाडी येथील असून आरोपी सूरज संभाजी सुतार हा राधानगरी तालुक्यातील कोणोलीपैकी असंडोली येथील आहे.
कोल्हापूर : आजच्या युवा पिढीकडून सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना आढळतो. परंतु सोशल मीडियावरुन झालेल्या ओळखीतून अनेक फसवणुकीचे प्रकारही निदर्शनास आलेले आहेत. त्याचा अनुभव सध्या कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या या धक्कादायक बातमीवरून लक्षात येईल. इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले गेले. याप्रकरणी एका 23 वर्षीय तरुणाला आजरा पोलिसांनी अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही आजरा तालुक्यातील मासेवाडी येथील आहे. तर आरोपी सूरज संभाजी सुतार (वय-23) हा राधानगरी तालुक्यातील कोणोलीपैकी असंडोली येथील असून त्याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला आज न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सुतार हा सुतारकाम करतो. मागील आठ महिन्यांपासून इन्स्टाग्रामवर त्याची मासेवाडी येथील अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. या ओळखीतून आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला सूरजने लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेले. तसेच तिच्यासोबत आठ दिवस शारीरिक संबंध ठेवले. यानंतर याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन आजरा पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले तर सूरजला अटक करण्यात आली.