no images were found
जी-20 संकल्पनेवरील रिल्सचे विद्यापीठात सादरीकरण
कोल्हापूर (प्रतिनिधी ): शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागामध्ये जी-20 संकल्पनेवर आधारित रिल्सचे सादरीकरण शनिवार, दि. 12 रोजी होणार आहे. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीमध्ये दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी विद्यापीठातील जी-20 उपक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर आहेत.
जी- 20 चे अध्यक्षपद यावेळी भारताकडे आहे. देशासाठी ही मोठी सन्मानाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध विद्यापीठांमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठानेही अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये रील मेकिंग हा उपक्रम एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाकडे देण्यात आला आहे.
जगासमोर भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जी-20 देशांनी काही संकल्पना राबवण्याचे निश्चित केले आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता अशा विविध अंगाने जगातील महत्त्वाच्या वीस देशांमध्ये गंभीरपणे चर्चा सुरू आहे. या मुद्यांना धरून विद्यार्थ्यांनी रिल्स तयार केल्या आहेत. या रिल्सचे सादरीकरण होणार आहे. रिल्स तयार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली.