no images were found
रंकाळा तलाव संवर्धन, सुशोभिकरणाच्या कामात हयगय नको : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून होणाऱ्या कामाबाबत काही महिन्यापूर्वी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रंकाळा तलावाच्या पुरातन वास्तुना कोणताही धोका होणार नाही. अशा पद्धतीनेच मंजूर निधीतून कामे होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्या नंतर नागरिकामध्ये असलेली संभ्रमावस्ता दूर झाली आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होवून वर्षभराचा कालावधी उलटला असून, काम संथ गतीने सुरु आहे. निधी असूनही काम थांबले असल्यास त्यात शासनाची बदनामी होणार असून, रंकाळा तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या कामात कोणतीही हयगय करू नका, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसर विकसित जतन व संवर्धन करणेच्या कामास नगरविकास विभागाकडून मुलभूत सोयी सुविधा अनुदान अंतर्गत रु.९.८४ कोटी, पर्यटन विभागाकडून मंजूर रु.४.८० कोटी, जिल्हा नियोजन समिती मधून मिनिचर पार्क साठी रु.२.५० कोटी आणि विद्युत रोषणाईसाठी रु.३.५० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून सुरु असलेल्या कामाची पाहणी आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली.
यावेळी कामाच्या सद्यस्थितीचा आढावा देताना शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत सुरु असलेल्या कामातून चार ठिकाणी शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, दुचाकी व चारचाकी पार्किंग व्यवस्था करणे, ५ ठिकाणी कमानी व गेटसह गेट वे तयार करणे, विद्युत रोषणाई (स्ट्रीट व फुट लाईट) व सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रंकाळा टॉवर ते तांबट कमानपर्यंत तलावाच्या भितींचे संवर्धन करणे, घाट दुरुस्ती करणे, अपुरा पदपथ पूर्ण करणे, तांबट कमान जतन व संवर्धन, विसर्जन कुंड पूर्ण करणे, स्केटिंग ट्रॅक बांधणे, लँडस्केपिंग, प्लांटेशन करणे या कामांचा समावेश आहे. यातील शौचालय बांधण्याचे काम जलसंपदा विभागाच्या परवानगी आणि गेट वे तयार करण्याचे काम पुरातत्व समितीच्या परवानागी अभावी थांबले असल्याचे सांगितले. याबाबत श्री.राजेश क्षीरसागर यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता आणि पुरातत्व समितीच्या अध्यक्षा श्रीमती निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर बाबी तपासून तात्काळ परवानगी देण्याच्या सूचना दिल्या. पर्यटन मधून मंजूर निधीतून रंकाळा तलावाच्या सभोवतालच्या नादुरुस्त झालेल्या लहान दगडी भिंतींची दुरुस्ती करणे, उतरत्या दगडी भिंतीची दुरुस्ती करणे, रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन करणे, संध्यामठ आणि धुण्याच्या चावी यांचे जतन व संवर्धन करणे या कामांचा समावेश असून, पहिल्या टप्प्यात रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरु असल्याचे श्री.घाटगे यांनी सांगितले. यासह मिनिचर पार्क व विद्युत रोषणाईच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु असून येत्या महिन्याच्या आत सदर कामे सुरु होतील, असे सांगितले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासास प्रथमच रंकाळा तलावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांनीही रंकाळा तलावास भेट दिली असून, या ऐतिहासिक तलावाचे संवर्धन, सुशोभिकरण करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून होणारी कामे संथगतीने सुरु आहेत. निधी असून काम थांबले तर सरकारची बदनामी होणार आहे. यासह पुढील विकास कामांसाठी येणारा निधीही ठप्प होणार आहे. रंकाळा तलावाच्या माध्यमातून एक चांगली डेव्हलपमेंट करून शहराच्या पर्यटन वाढीस चालना देण्याचा आपला उद्देश आहे. पुढील काळातही अधिकाधिक निधी आणून डेव्हलपमेंट करण्याची संधी आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रंकाळा तलावाची कामे गांभीर्याने घ्यावीत. या कामात कोणतीही हयगय करू नये, अशा सूचना दिल्या.
यावेळी श्री.क्षीरसागर यांनी रंकाळा तलावात विद्युत रोषणाईसह कारंजा उभारणे, संध्यामठ परिसरात सेल्फी पॉईंट उभारणे याकामांचे प्रस्तावही तात्काळ तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपशहरप्रमुख धनाजी कारंडे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त साधना पाटील, आर्कीटेक्ट रणजीत निकम यांच्यासह अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.