no images were found
‘प्रिन्स शिवाजी’ मध्ये ‘न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी’ला शासनाकडून मान्यता
कोल्हापूर- ( प्रतिनिधी ) राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी १९२० मध्ये स्थापन केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श शिक्षण संस्था’ म्हणून गौरविलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. शिवाजी पेठेतील शिक्षण संकुलामध्ये उभारलेल्या ‘न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी’ (डी. फार्मसी) या काॅलेजला ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय), नवी दिल्ली’ या शिखर परिषदेने मान्यता दिली. फार्मसी क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न साकार करणारे हे डी. फार्मसी काॅलेज फक्त मुलींसाठी आहे. विशेष म्हणजे, संस्थेने उभारलेली वर्षभरातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील ही तिसरी शाखा असून आता संस्थेच्या एकूण अकरा विद्याशाखा झाल्या आहेत.
“उच्च दर्जाच्या मोड्यूलर लॅब, स्मार्ट क्लासरूम, अद्ययावत ग्रंथालय, उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक, माफक दरात होस्टेल सुविधा अशा सर्व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असल्यानेच या काॅलेजला ‘पीसीआय’च्या अतिशय काटेकोर तपासणी प्रक्रियेतून एकही त्रुटी न येता मान्यता मिळाली आहे”, असे संस्थेचे विकास अधिकारी डाॅ. संजय दाभोळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
“बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद घेवून कार्यरत असणाऱ्या आणि बहुजन समाजातील होतकरू विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या शैक्षणिक उन्नतीस नेहमीच प्राधान्य देणाऱ्या आमच्या संस्थेने उभारलेले ‘न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी’, बहुजन समाजातील मुलींसाठी वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी क्षितीज रूंदावणारे ठरेल”, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी केले.
“न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी हे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीच्या डी. फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थिनींना पसंतीक्रमामध्ये पर्याय देण्यासाठी उपलब्ध असेल”, असे डाॅ. सचिन पिशवीकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस डाॅ. रविंद्र कुंभार, प्रा. नितीन पाटील, प्रा. विक्रम गवळी उपस्थित होते.