no images were found
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये श्रृंगारवाडी, पिराचीवाडी, पाटेकरवाडीचे केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी नामांकन – संजयसिंह चव्हाण
कोल्हापूर : स्वच्छतेच्या अभियानात देशात आणि राज्यात कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहीला आहे. “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ ” अंतर्गत राज्यस्तरीय पडताळणी समितीने पडताळणी केलेल्या ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत श्रृंगारवाडी (आजरा), पिराचीवाडी (कागल) व पाटेकरवाडी (करवीर) या तीनही ग्रामपंचायतींचे नामांकन केंद्र स्तरीय स्पर्धेसाठी झाले असून, यासाठी ग्रामपंचायती सज्ज आहेत. ऑगस्टमध्ये या ग्रामपंचायतींचे केंद्रस्तरीय पथकामार्फत सर्वेक्षण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिली आहे.
“स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३” अंतर्गत जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समिती मार्फत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये १५ ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय पथकाच्या माध्यमातून दिनांक ७ व ८ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली. यामध्ये ग्रामपंचायत श्रृंगारवाडी (आजरा), पिराचीवाडी (कागल) व पाटेकरवाडी (करवीर) या तीनही ग्रामपंचायतींची केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. केंद्र स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या या ग्रामपंचायतींची दि. १ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीत केंद्रस्तरीय पथकाच्या माध्यमातून पडताळणी होणार आहे.
केंद्र स्तरीय पथकामार्फत गावातील वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर, सार्वजनिक शौचालये, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी आणि शासकीय कार्यालये या ठिकाणी स्वच्छतेच्या सुविधा, गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, गावातील स्वच्छतेबाबत जाणीव जागृती याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. या निकषानुसार केंद्र स्तरावर पात्र ठरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या आहेत.