no images were found
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘व्हेरी गुड’ श्रेणी -महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे गौरव
कसबा बावडा/ वार्ताहर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमधील सर्व विभागांना ‘व्हेरी गुड’ ही श्रेणी जाहीर झाली आहे. राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी केलेल्या शैक्षणिक अवेक्षणानंतर ही श्रेणी देण्यात आली आहे. यामुळे पॉलिटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली.
राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईच्या तज्ज्ञ समितीने एप्रिल महिन्यात पॉलिटेक्निकला भेट देऊन तपासणी केली होती. यामध्ये पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनियरिंग,सिव्हिल इंजिनियरिंग , मेकॅनिकल इंजिनिअरिंग या तिन्ही विभागांच्या कामाची सविस्तर माहिती घेतली होती . त्यामध्ये भौतिक सुविधा,प्रयोगशाळा उपलब्धता, दैनंदिन शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगांशी समन्वय, विद्यार्थ्यांची क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी,प्रकल्प सादरीकरण, विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड याची तपशीलवार माहिती पाहिली होती. या सर्व क्षेत्रात पॉलिटेक्निकने अत्यंत चांगली कामगिरी केल्यामुळे या तीन ही विभागाना ‘व्हेरी गुड’ ही श्रेणी मिळाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले. यासाठी उपप्राचार्य प्रा.एम.पी.पाटील, रजिस्ट्रार प्रा. सचिन जडगे, अकॅडमिक मॉनिटरिंग प्रमुख प्रा. नितीन माळी, विभागप्रमुख प्रा. बी. जी. शिंदे, प्रा. महेश रेणके, प्रा. अक्षय करपे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.