
no images were found
बनावट सोयाबीन बियाण्यांमुळे कंपनीचा विक्री परवाना रद्द
नाशिक : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील ४१ सोयाबीन उत्पादकांना बियाणे बनावट निघून फसवणूक झाल्यामुळे सुमारे चार लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे. या फसवणुकीसंदर्भात राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य तथा करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन खेडलेझुंगे येथील शिवसिंधू फार्मर प्रोडय़ुसर कंपनीचा बियाणे विक्रीचा परवाना जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी कायमस्वरुपी रद्द केला आहे. सांगली येथील शिवतेज कंपनीने सोयाबीण बियाणे उत्पादित करून खेडलेझुंगे येथील शिवसिंधु फार्मर प्रोडय़ुसर कंपनीला विक्रीसाठी दिले होते. परंतु ही बियाणे बनावट निघाल्याने खेडलेझुंगे येथील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. शेतकऱ्यांनी यासंदर्भात राज्य बियाणे उपमितीचे सदस्य खंडू बोडके यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत मागील आठवडय़ात मंत्रालयात झालेल्या बियाणे उपसमितीच्या बैठकीत बोडके यांनी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याकडे बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक होत असल्याचा मुद्दा मांडला.
प्रधान सचिव डवले यांनी यासंदर्भात तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिवसिंधू फार्मर कंपनीने बियाणे नियंत्रण आदेश १९८३ च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याने कृषि विभागाने त्यांचा विक्री परवाना कायमस्वरुपी रद्द केला. सदर कंपनीचे संचालक सचिन गिते यांनी सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबद्दल आर्थिक मोबदला देण्याचे आश्वासन दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जवळ जवळ ४१ शेतकऱ्यांना १०८ गोणी बनावट सोयाबीन बियाणे विक्री केल्याने त्या शेतकऱ्यांना ३६५० रुपये प्रति नगप्रमाणे सुमारे चार लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांतून आर्थिक मोबदला मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही बियाणे विक्रेत्या कृषी कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. नाशिक जिल्ह्यातील बनावट बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश भरारी पथकाला दिले आहेत.
शेतकऱ्यांकडून सतत बियाणात फसवणुकीच्या तक्रारी येत असल्याने मंत्रालयात राज्य बियाणे उपसमितीच्या बैठकीत झालेल्या कारवाईचे निर्देशानुसार शिवसिंधू कंपनीचा विक्री परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे.