no images were found
ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन द्या : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली होती परंतु सदर ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी महानगरपालिका अखत्यारीतील एक एकरहून अधिक क्षेत्र असणाऱ्या जागांची यादी तयार करावी. दफनभूमीसाठी योग्य असणाऱ्या जागांची पाहणी करुन तात्काळ जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त श्री.राहुल रेखावार यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीत ख्रिश्चन समाज दफनभूमीसह राजाराम बंधारा पर्यायी पुलाचे काम आणि प्रयाग चिखली येथील श्री दत्त मंदिर सुशोभिकरण विकासाच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, ख्रिश्चन समाजासाठी सध्या कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये कदमवाडी आणि शिवाजी पार्क या दोन ठिकाणी दफनभूमी आहे. ही जागा दफनभूमीसाठी अत्यंत अपुरी पडत आहे. ख्रिश्चन बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना दफनभूमीसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी, कोल्हापूर शहरातील ख्रिश्चन बांधवांच्या दफनभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याकरिता तात्काळ मध्ये सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सादर करावा. गोसावी समाजासाठीच्या दफनभूमीसाठी देखील जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही जलद करावी. तसेच शहरातील आरक्षित जागा महानगरपालिकेला हस्तांतरित करु इच्छिणाऱ्या जागा मालकांकडून संमतीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही देखील करुन घ्यावी, जेणेकरुन शहरातील मोकळ्या जागांचा त्या त्या विकासकामांसाठी उपयोग करता येईल, अशा सूचना महानगरपालिका प्रशासनास दिल्या.
यानंतर श्री.राजेश क्षीरसागर यांनी, दर वर्षीच्या पूरस्थितीत शहराला जोडणारा राजाराम बंधारा हा रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे आसपासच्या २० ते २५ गावांचा संपर्क तुटला जातो. रस्ता बंद झाल्याने पूरस्थितीत सुमारे दोन महिने तो वाहतुकीस बंद होत असल्याने हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नाबार्डच्या माध्यमातून २०१७ मध्ये १७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला; पण त्याचेही काम भूसंपादना अभावी थांबले आहे. त्यामुळे याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून राजाराम बंधारा पर्यायी पुलाचे काम तातडीने सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांनी, शासनाने सदर पुलाच्या आवश्यक भूसंपादनासंदर्भात जमीन मालकांशी जागेच्या दरासंदर्भात तडजोड करण्याकरिता शिवाजी विद्यापीठाची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी शिवाजी विद्यापीठाच्या रजिस्ट्रार यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आणि भूसंपादनाचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या. यासह राजाराम बंधारा पर्यायी पुलाच्या अनिवार्य भूसंपादनाची प्रकिया तात्काळ सुरु करू, अशी माहिती दिली.
यानंतर श्री.राजेश क्षीरसागर, कोल्हापूर शहरालागतच पंचगंगा नदी काठावर प्रयाग चिखली हे श्री दत्त देवस्थान आहे. कोल्हापूर जिल्ह्यास वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीचे हे उगमस्थान आहे. प्रत्येक वर्षीच्या माघ महिन्यासह कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याकरिता कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोकण परिसरातून लाखो भाविक या ठिकाणी येतात. प्रयागच्या संगमावरती असणार्या घाटावर माघ महिन्यात स्नान करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी होते. भाविकांची वर्दळ लक्षात घेता या मंदिरासह परिसराचा विकास होऊन भाविकांना मुलभूत सोईसुविधा मिळणे गरजेचे आहे. त्याचाही आराखडा तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहायक आयुक्त विजय पाटील, उप शहर रचनाकार रमेश मस्कर, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मा.संपादकसो,