no images were found
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संस्कृती, राष्ट्रभक्तीच्या सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण
नागपूर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सायंकाळी कोराडीतील भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी कोराडी मंदिरात दर्शन घेतले. त्यांनतर भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केले.
जवळपास 20 मिनिटे राष्ट्रपती या दालनात उपस्थित होत्या. राजेंद्र पुरोहित यांच्याकडून त्यांनी दालनाची माहिती घेतली.
राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, भारतीय विद्या भवनचे राजेंद्र पुरोहित आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या माळ्यावरील दालनात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे, तर दुसऱ्या माळ्यावरील दालनात १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सचित्र मांडण्यात आली आहे.
चित्रांमधील घटना आणि व्यक्तिमत्त्वं समजून घेण्यासाठी येथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती देण्यात आली आहे. आतील सजावट ही राजवाड्यासारखीच असून, रंगसंगती, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. प्रभू श्रीरामाचा संपूर्ण जीवनप्रवास या दालनात रेखाटण्यात आला आहे.
कोराडी मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून हे दालन खुले झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या दालनामुळे मंदिर परिसराचे पर्यटन महत्त्व वाढले आहे.
रामायण आणि स्वातंत्र्यलढ्यावर आधारित संस्कृती आणि राष्ट्रभक्तीच्या केंद्राची माहिती जाणून घेतली.