no images were found
‘महिला आयोग आपल्या दारी’ जिल्ह्यात महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्यात: रुपाली चाकणकर
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार दि. ६ जुलै २०२३ रोजी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सकाळी ११ वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दि. ६ जुलै 2023 रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या विषयाच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे होणार आहेत. दौरा दरम्यान वन स्टाँप सेंटर तसेच महिला वसतीगृहास आयोगाच्या अध्यक्षा व सदस्या भेट देणार आहेत.
महिला आय़ोग आपल्या दारी या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या काना कोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.