no images were found
अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी रु.१०० कोटी मंजूर होण्याची दाट शक्यता
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. यामुळे विचारांचे अदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येत आहेत. यामुळे अपेक्षित असणारी विकास प्रक्रिया गतिमान करताना अडथळे निर्माण होत आहेत. ही उणीव दूर करण्याच्या हेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी कोल्हापूर शहरात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे Convention Center (परिषद केंद्र) निर्मिती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्याकडे दि.०९ जानेवारी २०२३ रोजी लेखी पत्राद्वारे केली होती. याबाबत तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानुसार नियोजन विभागाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी प्राथमिक स्वरूपात राजाराम तलाव येथील जागा प्रस्तावित केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री ना.मा.श्री.दिपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत संबधित विभागाचे अधिकारी यांची उद्या दि.१९ मे, २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता “सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई” येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा हा सर्व संपन्नतेणे व जैविविधतेने नटलेला असून, पश्चिम घाटाचा परिसर हा युनिस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहे. जिल्ह्यातील कृषि क्षेत्र, सहकार क्षेत्र यामुळे राज्याच्या सकल राज्य उत्पादनात कोल्हापूर जिल्हा भरीव योगदान देत आहे. जिल्ह्यातील श्री अंबाबाई मंदिरासह अन्य तीर्थक्षेत्र, गडकोट किल्ले यामुळे निसर्ग पर्यटनासह धार्मिक पर्यटनासाठी गेल्या काही वर्षात आकर्षण बिंदू ठरला आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने पर्यटक येथे भेट देत आहेत. कोल्हापूरला कलानगरी व क्रीडानगरी म्हणून संबोधली जाते. या शहराला कला, साहित्य, सांस्कृतिक व खेळाचा अनेक वर्षांचा वारसा लाभला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सीमा भाग या सर्वांचे केंद्र स्थान कोल्हापूर आहे. जिल्ह्यात इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, डॉक्टर्स, बार कौन्सिल, क्रीदाई, गोकुळ दुध संघ, बाजार समिती, औद्योगिक वसाहतींसह सामाजिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत अनेक संघटना आहेत. या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे अशा संघटनाना खासगी हॉटेल्स किंवा मर्यादित स्वरूपात असणाऱ्या शासकीय सभागृहांचा वापर करावा लागतो. यामधून विचारांचे अदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येत आहेत. यामुळे अपेक्षित असणारी विकास प्रक्रिया गतिमान करताना अडथळे निर्माण होत आहेत. ही उणीव दूर करण्याच्या हेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी कोल्हापूर शहरात Convention Center (परिषद केंद्र) उभारून त्याठिकाणी हजारो सभासदांकरिता बैठक व्यवस्था, अत्याधुनिक ऑनलाईन कॉन्फरन्स सुविधा, वाचनालय, आर्ट गॅलरी, जलतरण तलाव, उपहारगृह, प्रदर्शन हॉल या सारख्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे. हि आवश्यकता पूर्ण करण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या इतर पाच जिल्ह्यांच्या विचार करून या पाच जिल्ह्यांमधील भविष्यातील सामाजिक, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक वाढ व विकास प्रक्रिया गतिमान करण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती कोल्हापूर शहरात धर्मवीर आनंद दिघे Convention Center (परिषद केंद्र) निर्मितीसाठी रु.१०० कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली होती.
उद्या सह्याद्री अतिथीगृह येथे होणाऱ्या बैठकीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री ना.मा.श्री.दिपक केसरकर यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. उद्याच्या बैठकीत कोल्हापूर शहरात अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी रु.१०० कोटींचा निधी मंजूर होण्याची दाट शक्यता असून, यामुळे कोल्हापूरसह आसपासच्या पाच जिल्ह्यातील सामाजिक, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक वाढ व विकास प्रक्रिया गतिमान होण्यास चालना मिळणार आहे.