no images were found
एमपीएससी (कृषीसेवा) परीक्षेत सारथीचे 67 विद्यार्थी यशस्वी
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा – कृषी सेवा स्पर्धा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये सारथी पुणे मार्फत प्रायोजित एमपीएससी लाभार्थ्यांपैकी 67 विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यशस्वी 67 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांची उपसंचालक कृषी पदी, 39 विद्यार्थ्यांची कृषी अधिकारी, 23 विद्यार्थ्यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याची माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.
एमपीएससी (कृषीसेवा) 2021 परीक्षेतही सारथी विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान असे यश मिळवले असून पहिल्या दहामध्ये सारथीच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची यादी सारथीच्या www.sarthimaharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सारथी पुणे मार्फत एमपीएससी (कृषीसेवा) स्पर्धा परीक्षा 2021 चे प्रशिक्षण घेऊन यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. अहमदनगर-13, सोलापूर-12, पुणे-9, कोल्हापूर-7, सातारा-5, सांगली-4, अकोला-2, अमरावती-2, बुलढाणा-2, धुळे-2, उस्मानाबाद-2, वाशिम-2, औरंगाबाद-1, भंडारा-1, हिंगोली-1, जालना-1 व नाशिक-1.
सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून महाराष्ट्राच्या कृषी विकासाला हातभार लावावा, असे मत व्यक्त केले आहे.