
no images were found
ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय कार्यालयाच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे विधी तज्ज्ञ तानाजी पाटील उपस्थित होते. याप्रसंगी भारती हॉस्पिटल कोल्हापूर विभागाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अभिनंदन मुके, भारती हॉस्पिटलच्या डॉ. अनघा किणी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधिज्ञ डॉ.भाग्यश्री कुलकर्णी, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी भारती हॉस्पिटल (कोल्हापूर विभाग)चे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अभिनंदन मुके यांनी ‘ज्येष्ठांचे आरोग्य’ याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठांनी आजारपणाची लक्षणे आढळल्यास वेळीच निदान करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषधोपचार घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठांसाठी आयुर्वेदाचे महत्व, योगविद्या, आरोग्याची काळजी याबाबत त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी भारती हॉस्पिटलच्या डॉ. अनघा किणी यांनी ‘ज्येष्ठांचे आहार व घ्यावयाची काळजी’ याची माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधिज्ञ डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, कायदे व सल्ला’ याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 व ज्येष्ठ नागरिक अॅक्ट 2007 विषयीही त्यांनी माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या परिपोषण व निर्वाह भत्ता इ. संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्याबाबत विधी व सेवा प्राधिकरणाच्या मदतीने ज्येष्ठांना न्याय देण्याचे काम या विभागामार्फत चालविले जाते, याचा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उपयोग करुन घ्यावा. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या हेल्पलाइन क्रमांक 14567 या वर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत संपर्क साधून माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परब, प्रास्ताविक समाज कल्याण निरीक्षक कल्पना पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी नीलम गायकवाड, सचिन कांबळे, सविता शिर्के व कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार सुरेखा डवर यांनी केले. कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे दिलीप पेटकर, डॉ मानसिंग जगताप, मंगल पाटील, सुनिता कविस्कर, शोभा नाईक, लता कदम ,बाळासाहेब देशमुख, अशोक कांबळे, युवराज राजवाडे, सुरेश मारुती कांबळे इत्यादी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.