
no images were found
कोल्हापूर जिल्ह्यात जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश
कोल्हापूर जिल्ह्यात जनावरे चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, चोरीला गेलेली जनावरे पुन्हा परत मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तक्रारदारांकडून गुन्हे दाखल करण्यात येत होते.
कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणांहून दुभत्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करण्यात आला आहे.जयसिंगपूर पोलिसांनी दोघांना अटक करत पाच लाखांवर किंमत असलेली जनावरे ताब्यात घेतली.
पोलिसांनी युवराज मल्लाप्पा तेली (वय 24, मूळ गाव केंपवाड, ता.कागवाड, कर्नाटक, सध्या रा.इचलकरंजी), राहुल यमनाप्पा सनगुंडे (वय 22, रा.डेक्कन गल्ली, गल्ली नं. 1 इचलकरंजी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.इचलकरंजीतील एका महिलेचाही या संशयितांमध्ये समावेश आहे. अजून त्या महिलेला अटक करण्यात आलेली नाही.
जयसिंगपूर पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती मिळवून तपास यंत्रणा गतिमान केली. संशयित युवराज तेली व राहुल सनगुंडे हे दोघेजण जनावरे चोरुन विकत असल्याची माहिती मिळाली होती. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर निमशिरगाव येथील गाय चोरुन नेल्याची कबुली त्यांनी दिली. शिवाय त्यांच्याकडून शिरोळ, हातकणंगले, हुपरी, करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरलेली 4 लाख 70 हजार रुपये किंमतीची 11 जनावरे ताब्यात घेण्यात आली.
जिल्ह्यातील सात गुन्हे संशयितांकडून उघडकीस आले आहेत. जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, पोकाॅ, प्रभावती सावंत, डावाळे, अमोल अवघडे, वैभव सुर्यवंशी, होमगार्ड बेडगकर यांच्या पथकाने केली.