no images were found
विकासकामात खोडा घालणाऱ्या संजय पवार आणि टोळक्यावर कायदेशीर कारवाई करावी : सुजित चव्हाण
कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब आणि उप-मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात विकासकामांची गंगोत्री वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या कोटींचा निधी दिला गेला आहे. एकीकडे निधी, विकासकामे या माध्यमातून जिल्ह्याचा व शहराचा विकास व्हावा, ही सरकारची मानसिकता असताना या विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार व त्यांच्या टोळक्याकडून केला जात आहे. त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेवून केली.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, याआधी आंदोलनातील तोडपाणी करून अधिकाऱ्यांना धमकाविण्याचे संजय पवार आणि त्यांच्या टोळी करून करण्यात येत होते. परंतु आता उघड – उघड बैठकीत धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेस प्राप्त निधीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना उघड धमकी दिली आहे. याबाबत आज दि.०३ जून २०२३ रोजीच्या विविध वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकशाही पद्धतीने आंदोलने होणे अपेक्षित असताना, अधिकाऱ्यांना खुलेआम धमकावणे हे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे. त्यामुळे सदर जिल्हाप्रमुखांच्या धमक्यांबाबत अधिकारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासावर होणार असून, यातून कोल्हापूरचा विकास खुंटणार आहे. अधिकाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार यापूर्वीही सदर टोळक्याकडून झाले असून, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.यावेळी बोलताना महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांनी, कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या इतर पाच जिल्ह्यांच्या विचार करून या पाच जिल्ह्यांमधील भविष्यातील सामाजिक, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक वाढ व विकास प्रक्रिया गतिमान करण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती कोल्हापूर शहरात हे सेंटर उभारले जाणार आहे. सुमारे शंभर कोटी रुपये खर्चून राजाराम तलावाजवळील जागेत कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणारे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु, कोल्हापूरच्या विकासकामात आडकाठी घालण्याची भूमिका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख सुनील मोदी यांनी घेतली आहे. स्वत: जिल्हाप्रमुख म्हणून कर्तव्यहीन असणाऱ्यांनी सत्ता – असो वा नसो कधीही कोल्हापूरच्या विकास कामासाठी निधी मागणी केल्याचे ऐकिवात नाही. पण, एखादे चांगले काम होत असेल तर त्यात खोडा घालण्याचे काम हे करत आहेत. सदर कन्व्हेन्शन सेंटरची जागा मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या विविध विभागांच्या सर्व्हे अंतीच निश्चित करण्यात आली आहे. पण, याला विरोध करून जनतेत संभ्रम पसरविला जात असल्याचे सांगितले.
शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी, संजय पवार यांनी एका निवडणुकीत पैशाचा व्यवहार केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. तशाच पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून हप्ते सुरु केले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेवून सदर टोळक्यावर कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली.उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी, कोल्हापूर महानगरपालिका येथे झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने शासकीय कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास खुलेआम धमकावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, समाजामध्ये संभ्रमावस्ता निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि त्यांच्या टोळक्यावर कायदेशीर कारवाई करून शहर व जिल्ह्यात सुरु असलेल्या अशा गैरप्रकारांना आळा घालणेची मागणी केली. तर जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी, कन्व्हेन्शन सेंटर संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खुलासा होवून जनतेतील होणारा संभ्रम दूर करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी, संबधित बैठकीत घडलेल्या घटनेची माहिती घेवून पुढील कारवाई करण्याबाबत आश्वासित केले. यासह कन्व्हेन्शन सेंटरला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून होणारा विरोध थांबविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, युवासेना जिल्हा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, उपशहरप्रमुख सुरेश माने, कपिल नाळे, दीपक चव्हाण, कपिल केसरकर, आशिष ओसवाल आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.