
no images were found
छोटा राजन टोळीच्या शार्प शूटरला बेड्या ठोकल्या; ठाणे पोलिसांची कारवाई
ठाणे : ठाणे पोलिसांची मोठी कारवाई- ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याकांड प्रकरणातील आरोपी, गुन्हेगारी टोळीचा प्रमुख छोटा राजनच्या टोळीचा फरार शूटरला बेड्या ठोकण्यात ठाणे पोलिसांना यश आलं आहे. हा फरार आरोपी आधी जेलमध्येच कैद होता. पण पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झाला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरच्या बॉडीगार्डच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी छोटा राजनच्या टोळीचा शूटर बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद याला बेड्या ठोकल्या होत्या. तो पळून गेला होता. पण त्याला पुन्हा शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.
गुन्हेगारी टोळी प्रमुख छोटा राजन याने 2011 साली विरुद्ध गुन्हेगारी टोळीचा प्रमुख दाऊद कासकर याचा भाऊ इक्बाल कासकरचा बॉडीगार्ड आरिफ बैल यास जीवे ठार मारण्याचे फर्मान काढले होते. त्याप्रमाणे छोटा राजनचा विश्वासू सहकारी रवी मल्लेश बोरा उर्फ डिके राव बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद आणि इतर सात जणांनी आरिफ बैल यास मुंबई नागपाडा पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार करून जीवे ठार मारले होते.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी डिके राव, छोटा राजन व इतर आरोपींविरुद्ध नागपाडा पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल केला होता. नमूद गुन्ह्यात बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद यास व इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला फायरिंगमधील मुख्य आरोपी बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद हा नागपूर कारागृह येथून पॅरोलवर रजेवरून फरार झाला होता. त्याबाबत मुंब्रा पो.ठाणे गु. र. नं.669 /22 IPC 224 प्रमाणे गुन्हा दाखल होता. आरोपीचा शोध पोलीस पथकाकडून चालू असताना पथकाचे पोलीस नाईक भामरे यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासाच्या आधारे या पथकाचे सपोनि जाधव, ASI स्वप्नील प्रधान पोहा भुरके, पो.शि. ठाकरे व पथक यांनी आरोपीस मुंब्रा येथून ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.