no images were found
पालकमंत्री ना.दिपक केसरकर यांच्या हस्ते महापालिकेच्या आपला दवाखान्याचे उद्घाटन
कोल्हापूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भागवत कराड यांच्यासह मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. कोल्हापूर येथील पितळी गणपती, ताराबाई पार्क, एम्पायर बिल्डींग येथील महापालिकेच्या रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ.पी. एस. कांबळे, उपायुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल देशमुख, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक आशा कुडचे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.स्मिता खंदारे, महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजयसिंह खाडे-पाटील, निलेश देसाई, अजित ठाणेकर, वैभव माने, उपशहर अभियंता नारायण भोसले, रमेश कांबळे, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता पाटील, अमोल माने, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरु करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील. महाराष्ट्र दिनानिमित्ताने कोल्हापूर जिल्हयातील २८ आरोग्यवर्धनी केंद्रापैकी ६ नगरपालिका क्षेत्रात व १ महानगरपालिका क्षेत्रामधील संस्थेचे रुपांतर, “हिंदु ऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” मध्ये करण्यात आले आहे. आरोग्यवर्धनी केंद्राअंतर्गत बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता तपासणी, लसीकरण, नेत्र तपासणी व सर्व तपासण्या मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. “आपला दवाखाना” ची वेळ दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत असून सर्व आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. महानगरपालिकेच्यावतीने पितळी गणपती ताराबाई पार्क, एम्पायर बिल्डींग, कोल्हापूर येथे आजपासून ‘आपला दवाखाना’ रुग्णासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे स्वरुप – राज्यभरात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये रक्त तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा असेल. तसेच बाहय रुग्ण विभागात वैद्य, स्त्री रोग व प्रसुती तज्ञ, बाल आरोग्य तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ असतील. या केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशिय कर्मचारी, अटेंडंट, गार्ड आणि सफाई कामगार आदी मनुष्यबळ असेल.