no images were found
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा डॉ. नानासाहेब थोरात, डॉ. व्ही.एन. शिंदे
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र असणारे उदयोन्मुख शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या द्वितिय स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. गत वर्षीपासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये यंदा कोविड लस संशोधनात महत्त्वाची कामगिरी बजावणारे जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांची व्याख्याने होणार आहेत. दि. ३ व ४ मे २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता या व्याख्यानांचे आ’लोकशाही या युट्यूब वाहिनीवरून प्रसारण होईल.
दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा द्वितिय स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेमध्ये दि. ३ मे रोजी विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे ‘मराठी विज्ञान साहित्य’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. शिंदे हे सध्या शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव असून विज्ञान लेखनाच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. विज्ञान, वैज्ञानिक, वनस्पती व कृषी शास्त्रज्ञ यांविषयी त्यांची पुस्तके प्रकाशित असून या विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात. त्यासाठी त्यांना राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण पुरस्कारासह अनेक साहित्यिक पुरस्कार प्राप्त आहेत.
दि. ४ मे रोजी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांचे ‘आजचा भारत आणि विज्ञान’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. डॉ. थोरात यांची ऑक्सफर्ड विद्यापीठातील कोविड लसनिर्मिती करण्यात यशस्वी ठरलेल्या चमूमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठासह ते आयर्लंडच्या लिमरिक विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक आहेत. रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनचे ते फेलो आहेत. त्यांना जागतिक प्रतिष्ठेची मेरी क्युरी फेलोशीप तीन वेळा प्राप्त झाली आहे. नॅनो मटेरियल्स व नॅनो तंत्रज्ञानाच्या आधारे स्तन तसेच मेंदूच्या कर्करोगावर लस तथा औषध शोधण्याच्या दिशेने त्यांचे सातत्यपूर्ण संशोधन सुरू आहे.
सदर व्याख्यानमाला आ’लोकशाही या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणार असून त्यात प्रेक्षकांना https://www.youtube.com/@Alokshahi या लिंकद्वारे सहभागी होता येईल, अशी माहिती डॉ. आलोक जत्राटकर आणि संतोष पिसे यांनी दिली आहे.