no images were found
3 नक्षलवादी चकमकीत ठार; सी 60 जवानांचा देवेंद्र फडणवीसा यांच्या हस्ते सत्कार
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वदिनी गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले.गडचिरोली येथे अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत 38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी ठार झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ही चकमक झाली. महाराष्ट्र पोलिसांच्या C60 दलाला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. पोलिसांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी सांगितले.
एसपी म्हणाले की, शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी आमच्या टीमवर गोळीबार केला, ज्यावर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीनही नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. यासोबतच शस्त्रे आणि इतर वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात मृतांपैकी एकाची ओळख पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी आहे. तर पेरिमिली दलमचा वासू आणि अहेरी दलमचा श्रीकांत अशी आणखी दोघांची नावे आहेत.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी काल तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्या नजीक असलेल्या दामरंचा आणि दुसरीकडे थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. सी-60 जवानांचा गणवेश परिधान करुन एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच एक आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आणि त्यांचा उत्साह वाढविला. त्यांचा सत्कारही केला.
गडचिरोली येथे देवेंद्र फडणवीस यांनी शहीद स्मारकाला अभिवादन केले. पोलिस अधीक्षक कार्यालयातील एकलव्य सभागृहात त्यांनी सी-60 च्या जवानांचा सत्कार केला. या नूतन सभागृहाचे सुद्धा उदघाटन केले. दादालोरा खिडकी या नावाने एक योजना गडचिरोली पोलिस राबवित असून, शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम गडचिरोली पोलिस करीत आहेत. या योजनेशी प्रशंसा करतानाच काही लाभांचे वितरण या दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले
अतिसंवेदनशील भागात साधारणत: आमदारांच्या पलिकडे कुणी भेटत नाही, तेथे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी वैयक्तिक संवाद साधला. एसटीचा अर्ध्या तिकिटात प्रवास, शेतीच्या कोणकोणत्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात, असे प्रश्न त्यांनी महिला, पुरुषांकडून विचारले आणि शासकीय योजनांबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. काही महिलांनी सध्या केवळ सकाळी आणि सायंकाळीच बस येते, दुपारी बस सुरु करा, अशी मागणी केली. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले