no images were found
महिला व किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करा – गीता पाटील
कोल्हापूर : महिला व किशोरवयीन मुलींच्या या सुरक्षितेतच्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घ्यावा,असे प्रतिपादन करवीर पोलीस उपनिरीक्षक गीता पाटील यांनी केले.महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत अस्मिता लोक संचलित साधन केंद्र बालिंगा व स्फूर्ती लोकसंचलित साधन केंद्र पोर्ले मधील कार्यकारणीची स्थानिक पोलीस यंत्रणे सोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस करवीर पोलीस उपनिरीक्षक गीता पाटील, करवीरच्या संरक्षण अधिकारी लता पाटील, जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हा समन्वय अधिकारी श्री. कांबळे यांनी बैठकीचा मुख्य उद्देश सांगितला. त्यानंतर माविमच्या कार्याची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितली. यामध्ये माविम कार्यरत असलेले तालुका, गाव, बचत गट, महिला व चालू आर्थिक वर्षात महिलांना वैयक्तिक व गट यांना दिलेले कर्ज तसेच सामाजिक उपक्रम, सद्यस्थितीत सीएमआरसी पातळीवर सुरु असलेले सब प्रकल्प याची माहिती दिली.
संरक्षण अधिकारी लता पाटील यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, हिंदू विवाह कायदा 1955, हिंदू दत्तक व निर्वाह कायदा 1956, स्त्रियांचे मालमत्ता व वारसा हक्क कायदे, विवाहित स्त्रियांच्या संपत्ती कायदा 1959, गर्भपात अल्पवयीन मुलींना फूस लावून अपहरण करणे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मानसिक व आर्थिक त्रास, कामगार महिलेचे हक्क आदी कायदे विषयक माहिती दिली. तसेच तालुका संरक्षण अधिकारी याची माहिती दिली तसेच भविष्यात काही अडचण आली तर मार्गदर्शन व योग्य कार्यवाही करु, असे आश्वासन श्रीमती पाटील यांनी दिले.
करवीर पोलीस उपनिरीक्षक गीता पाटील म्हणाल्या, नवीन तंत्रज्ञानामुळे युवा पिढी भरकटत चालली आहे. याकरिता पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपण समाजाचे देणे लागत असल्याने समाजासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे, महिलांनी गावपातळीवर छोटे छोटे कार्यक्रमआयोजित करुन कायदेविषयक जनजागृती केली पाहिजे, महिलांनी पोलीस यंत्रणेबाबत कोणतीही भीती बाळगू नये, पालक व मुलांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असावेत, कायदा हा नेहमी सत्याच्या बाजूने असतो त्यामुळे नेहमी सत्याचा विजय होतो. भविष्यात काहीही अडचण आल्यास आम्ही सहकार्य करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या गुरव यांनी तर आभार उमेश लिंगणूरकर यांनीमानले.कार्यक्रमास माविमचे कर्मचारी, सीएमआरसी व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, सहयोगिनी, बालिंगा व पोर्ले सीएमआरसी मधील कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.