
no images were found
टीना दत्ताने सांगितले सुरीलीचा लुक तिच्या रोजच्या लुकने प्रेरित आहे
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनी ‘हम रहें ना रहें हम’ या नवीन मालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसाठी एक आकर्षक कथानक घेऊन आली आहे. या मालिकेत दमयंती आणि सुरीली या दोन खंबीर स्त्रियांची गोष्ट आहे. यातील दमयंती ही रणकगढ येथील बारोट या राजघराण्यातील परंपरावादी आणि सिद्धांतवादी राजमाता आहे, तर सुरीली आधुनिक विचारांची एक चुणचुणीत मुलगी आहे. या मालिकेत कोणत्याही बदलाचा विरोध करण्याच्या मानवी वृत्तीचे दर्शन घडवले आहे. बऱ्याचदा माणसाला बदलाची भीती वाटते, त्यामुळे बदलाचा विरोध करणे किंवा परिस्थितीपासून पळ काढणे हे दोनच मार्ग त्याच्यापुढे उरतात. या जीवनाशी निगडीत आणि प्रेरणादायक कथानकात किट्टू गिडवानी दमयंती बारोटच्या तर टीना दत्ता सुरीली अहलुवालियाच्या भूमिकेत आहे. जय भानुशाली या मालिकेत शिवेंद्र बारोट ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
सुरीली ही तिच्या कुटुंबातली एकुलती एक कमावणारी व्यक्ती आहे. ती एक ग्रामोफोन कॅफे चालवते, जो तिच्या माता-पित्याच्या मृत्यूनंतर तिच्याकडे आला आहे आणि तो तिचा खूप आवडता आहे. टीना दत्ता ही अगदी चार-चौघींसारखी मुलगी आहे. गंमत म्हणजे, तिला तसा लुक देण्यासाठी तिच्या दैनंदिन लुकमधूनच प्रेरणा घेण्यात आली आहे. टीना दत्ता बऱ्याचदा थोडे ढगळ शर्ट, टी-शर्ट, बॅगी पॅन्ट आणि फंकी आभूषणे अशी साधी पण आकर्षक वेशभूषा करते. सुरीलीच्या लुकसाठी तिने या पोषाखावर हाफ बन घालून केस रंगवले आहेत.
सुरीलीच्या या लुकविषयी टीना दत्ता म्हणते, “जी फॅशन करून तुम्हाला आरामदायक वाटते, अशाच फॅशनने तुम्ही छान दिसता. तुम्ही मला बऱ्याचदा ढगळ टी शर्ट आणि त्यावर बॅगी पॅन्ट अशा पोषाखात बघितले असेल. गंमत म्हणजे आमच्या निर्मात्यांनी सुरीलीला देखील अशाच रूपात कल्पिले आहे! मला आठवते आहे, मी सुरुवातीच्या एका मीटिंगला असाच पोशाख करून गेले होते आणि त्यावेळी या टीमला वाटले की जणू सुरीलीच आली आहे. त्यामुळे, मी खुश आहे की मला एक अशी व्यक्तिरेखा करायला मिळते आहे, जिची स्टाइल माझ्यासारखीच आहे.”