no images were found
छोट्या बचत योजनेचे नियम बदलले
नवी दिल्ली : आता तुमच्याकडे पॅन आणि आधार नसेल तर तुम्ही छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. अर्थ मंत्रालयाने अल्पबचत योजनेत गुंतवणुकीबाबत नियम बदलले आहेत आणि याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस बचत योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारख्या लहान बचत योजना सुरू करण्यासाठी पॅन आणि आधार अनिवार्य करण्यात आले आहेत. ही अधिसूचना ३१ मार्च २०२३ रोजी जारी करण्यात आली आहे.
लहान बचत योजनांसाठी केवायसी प्रक्रियेचा भाग म्हणून आधार आणि पॅन अनिवार्य करण्यात आले आहेत. आता सरकारी अल्पबचत योजनांसाठी आधार आवश्यक झाले असून गुंतवणूक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास पॅनकार्डही द्यावे लागणार आहे. आता अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी आधार आवश्यक झाले आहे. तथापि, जर तुम्ही पीपीएफ, एस एस वाय, ऐन एस सी, एस सी एस एस किंवा इतर कोणत्याही लहान बचत खात्यात गुंतवणूक सुरू करताना आधार क्रमांक देऊ शकत नसाल, तर तो सहा महिन्यांच्या आत द्यावा लागेल. आधार क्रमांक अद्याप जारी केला नसल्यास, आधार नोंदणी क्रमांक देखील दिला जाऊ शकतो. तुम्ही आधीपासून त्यात गुंतवणूक करत असाल आणि आधार कार्ड दिलेले नसेल, तर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत द्या. आधार न दिल्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून खाते गोठवले जाईल आणि माहिती दिल्यावरच ते उघडले जाईल.