no images were found
रावसाहेब दानवेंकडूनही शिवाजी महाराजांचा अपमान?
औरंगाबाद, : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे म्हणत या वादात भर घातली. यानंतर भाजपाचे आणखी एक नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. यावरून पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.
भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं सुरूच आहे. शिवरायांचा जन्म हा कोकणात झाला असं वादग्रस्त वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचर घेतला आहे. विरोधकच नाही तर शिंदे गटाचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. मंत्रिपद गेलं खड्ड्यात शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.