
no images were found
दिलेल्या मुदती पूर्वीच पूर्ण होणार अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिर
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्यदिव्य राम मंदिराचं बांधकाम नियोजित वेळेच्या तीन महिने आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी संबंधित एका अधिकाऱ्यानं यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे बांधकाम मुदतीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
रामजन्मभूमी येथील ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, मंदिराचे काम निर्धारित तारखेच्या तीन महिने आधी पूर्ण होईल, त्यामुळे आता आम्ही डिसेंबर 2023 ऐवजी सप्टेंबर 2023 पर्यंतचा वेळ निर्धारित केला आहे.
प्रकाश गुप्ता पुढे बोलताना म्हणाले की, “अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराचा गर्भगृह अष्टकोनी असेल. देशातील सर्व भक्तांच्या मनातील भव्यदिव्य प्रभू श्रीरामांचं हे मंदिर आता आकार घेत असल्याचं दिसतंय. या मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 75 टक्के काम पूर्ण झालं आहे. आता या मंदिरात फक्त 167 खांब बसवण्याचं काम बाकी आहे.”या’ वर्षाच्या अखेरीस काम पूर्ण होणं अपेक्षित
त्याचवेळी ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, “मंदिराचं बांधकाम नियोजित वेळेपूर्वी सुरु आहे. लवकरच गर्भगृहाचे खांब बसवण्याचं काम सुरु होईल.” श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, “अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु आहे. 2023 च्या अखेरीस या मंदिराच्या मूळ गर्भगृहाचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे.”
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचं काम जोरात सुरु आहे. यासाठी लोक सढळ हस्ते देणगी देत आहेत. दरम्यान, भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या रोख देणगीतही वाढ झाली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “राम मंदिरासाठी दिल्या जाणाऱ्या रोख देणगीत तीन पटीने वाढ झाली आहे.” ते म्हणाले की, “रामजन्मभूमीत येणारे भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत.”