
no images were found
‘ईडी’चे अधिकारी परीक्षा केंद्रात जातात तेव्हा ……
ईडीच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली आहे.पंतप्रधान आवास योजनेतील निविदात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र याच छापेमारी दरम्यान एक वेगळी घटना पाहायला मिळाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील काही कंत्राटदाराच्या घरावर ईडीने छापे टाकले. याचवेळी ‘इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस’चे रितेश कांकरीया यांच्या उल्कानगरीतील आदित्यनगरातील पसायदान अपार्टमेंटमधील फ्लॅटवर देखील एका पथकाने धडक दिली. पथकाने छापेमारी केली तेव्हा घरात रितेश यांच्या भावासह पत्नी आणि मुलं उपस्थित होती. तर रितेश यांच्या दहावीतील मुलगी परीक्षेसाठी गेली होती. पण दुपारी एक वजता तिचा पेपर सुटणार असल्याने रितेश यांच्या भावाने पुतणीला आणण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. पण कुटुंबातील सदस्यांना एकटे न जाऊ देता ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या चुलत्याला सोबत घेत स्वतःच्या गाडीतूनच मुलीला परीक्षा केंद्रावरुन घरी आणले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदा घोटाळ्या प्रकरणी ईडीने सकाळी पहाटेच नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. दरम्यान दिवस आणि रात्रभर सुरु असलेली कारवाई आज सकाळी 6 वाजता संपली आहे. त्यामुळे ईडी पथकाने केलेली कारवाई तब्बल 24 तास सुरु असल्याचे पाहायला मिळाले.