no images were found
कबनूर उरुसानिमित्त बनावट नोटा खपविणाऱ्या एका कुटुंबाला ताब्यात
इचलकरंजी : कबनूर यात्रेच्या धामधुमीत सोलापुरातून आणलेल्या बनावट नोटा खपविणाऱ्या एका कुटुंबाला आज येथील नागरिकांनी प्रसंगावधान राखत शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. कुर्डूवाडी (जि. सोलापूर) येथील बनावट नोटा प्रकरण ताजे असतानाच तेथील काळोखे कुटुंब इचलकरंजीत बनावट नोटा खपविताना सापडले.त्यांच्याकडून ५००, २०० व ५० रुपयांच्या २३ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्यांनी या नोटा कोठून आणल्या, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
राजन नामदेव काळोखे (वय २९), पुतळाबाई नामदेव काळोखे (५१), धनश्री राजन काळोखे (२२) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील कबनूरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील चहाच्या टपरीवर मंगळवारी दुपारी कारमधून उतरलेल्या दोघींनी ५०० रुपयांच्या मोडीची मागणी केली. त्यांच्यासोबत एक लहान मूलही होते.
त्यावेळी काहींना त्यांचा संशय आल्याने नागरिकांनीच त्यांच्यावर पाळत ठेवली. हे कुटुंबीय कबनूरकडे निघाले असता त्यांना अडवून नागरिकांनी चौकशी केली. त्यामध्ये त्यांच्याकडे बनावट नोटा असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना घेऊन नागरिक शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले. तेथे पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांच्याकडे वरीलप्रमाणे बनावट नोटा आढळल्या.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंबीय कबनूर येथील उरुसानिमित्त तेथे फेरीवाले, फुले, हार विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते अशा छोट्या व्यावसायिकांची गर्दी होऊ लागल्याने त्याचा गैरफायदा घेत नोटा खपविण्यासाठी आले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांचे नेमके कोणत्या टोळीशी संबंध आहेत का, याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. प्राथमिक तपासानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितले.