no images were found
जुनी पेन्शन योजने साठी कोल्हापूर जिल्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने मंगळवारपासून सरकारी निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेली आहेत.
राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेली आहेत. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत संघटनेची बैठक झाली. त्यात तोडगा न निघाल्याने सोमवारी सायंकाळी संघटनांनी संप सुरू करत असल्याचे जाहीर केले.
मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत टाऊन हॉलमध्ये संघटनेच्या प्रमुखांची भाषणे झाली . त्यानंतर शहरातून रॅली काढण्यात आली. संपाच्या आधीच सोमवारी दुपारनंतर सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. संघटनेचे पदाधिकारी संपाबाबतच्या बैठकीला गेले होते. तर संपाच्या वातावरणामुळे अन्य कर्मचारीही गायब झाल्याचे चित्र होते.
या संपात जिल्ह्यातील सरकारी शाळा, अनुदानित शाळा, जिल्हा परिषद महापालिका शाळा तसेच ज्युनिअर कॉलेज, डी.एड. कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, शिक्षण उपसंचालक कार्यालय यांसह शैक्षणिक कार्यालयातील कर्मचारी सहभागी आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील साडेतीन हजार शाळांमधील साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे.
सध्या दहावी- बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. पेपर असेल त्या दिवशी शिक्षक व कर्मचारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित असतील. परीक्षा सुरळीत पार पडेल. पण ड्युटीवर असलेले कर्मचारी मस्टरवर सही करणार नाहीत किंवा आपली हजेरी नोंदवणार नाहीत.