no images were found
कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांसाठी रु.१०० कोटींचा निधी मंजूर : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता सादर करण्यात आलेल्या रु.१०० कोटींच्या प्रस्तावास आज मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून यापूर्वी दोन प्रस्ताव सादर करण्यात आले होते. परंतु, प्रस्तावातील काही त्रुटी आणि सुधारणा करून हा प्रस्ताव शासन स्तरावर पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याबाबत तत्कालीन नगरविकास मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री नाम.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वप्रथम बैठक घेतली होती. या निधीमंजुरीसाठी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. यास सकारात्मक प्रतिसाद देत नाम.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून नव्याने सादर केलेल्या रु.२३७ कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. यावेळी प्रस्तावाचे दोन टप्पे करण्याची सूचना महानगरपालिका प्रशासनास केली होती. या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाने पहिल्या टप्प्यातील कामांचा प्रस्ताव सद्याच्या डीएसआर नुसार सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील प्रमुख १८ कामांसाठी महानगरपालिकेकडून रु.१०० कोटींचा प्रस्तावाला तत्त्वत: मान्यताही दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने उपसमितीचा ठराव करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी दिली व सदर प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे अंतिम मंजुरी साठी सादर करण्यात केला. याबाबत गेल्या चार दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभाग १ चे सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभाग २ च्या सचिव श्रीमती सोनिया सेठ, नियोजन विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांची संयुक्तिक बैठक आयोजित करून सदर प्रस्ताव मागाविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत प्रधान सचिव (नवि २) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांसाठी पहिल्या टप्यात रु.१०० कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
मर्यादित उत्पन्न स्त्रोतामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. अशातच सन २०१९ आणि सन २०२१ च्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून वाहणाऱ्या पंचगंगा नदी व त्यास जोडणाऱ्या नाल्यांमुळे शहरास महापुराचा फटका बसला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुमारे ८२ प्रभागांपैकी सुमारे ३५ प्रभाग महापुराच्या पाण्याने बाधित झाले होते. त्यामुळे या पूरबाधित प्रभागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, नागरिकांना यातून वाहतूक करणे जिकिरीचे होत आहे. सदर निधीद्वारे कोल्हापूर शहरातील प्रमुख वर्दळीचे १६ रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटर, ड्रेनेज लाईन व फुटपाथ यांचा सुनियोजित विकास करण्यात येणार आहे. मंजूर निधीतील ७० टक्के हिस्सा राज्य शासनाचा असून ३० टक्के हिस्सा महानगरपालिकेचा असणार आहे. या ३० टक्के निधीबाबतचे हमीपत्र कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सादर केले असून, लवकरच रस्त्यांच्या कामासाठी निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर शहरातील प्रमुख वर्दळीचे रस्ते खड्डेमुक्त आणि सुस्थितीत झाल्याचे दिसणार आहे. या निधी मंजुरीबाबत मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नाम.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांचे करवीरवासीयांच्या वतीने आभारही श्री.राजेश क्षीरसागर यांनी मानले.
या पत्रकार परिषदेस माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाडगे, उपशहर प्रमुख अभिजीत काशीद, युवा सेना शहर सरचिटणीस विपुल भंडारी, फेरीवाले सेना शहर प्रमुख अर्जुन आंबी आदी उपस्थित होते.