
no images were found
वडिलांचे अंत्यसंस्कार करून तो गेला परीक्षेला
बांबवडे : बारावीचे वर्ष अंतिम टप्प्यात असताना त्याचे वडील आजारी पडले. वडिलांची सुश्रुषा करत त्याने झटून अभ्यासही केला. पण ऐन परीक्षेत आजारी वडिलांचे निधन झाले. वडिलांवर अंत्यसंस्कार करून त्याला बारावीच्या परीक्षेला जाण्याचा दुर्दैवी प्रसंग आला. हि घटना घडली शाहुवाडी तालुक्यातील चरण या गावात.
चरण (ता. शाहूवाडी) येथील संभाजी शिसाळ हे शिराळा येथे भूमी अभिलेख अधीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून, संभाजी शिसाळ काही महिन्यापूर्वी अचानक आजारी पडले. त्यांचा विश्वजीत हा मुलगा समाज विकास विद्यालय सागाव येथे बारावी विज्ञान या शाखेतून शिक्षण घेत आहे. तो दररोज वडिलांची सुश्रुषा करून कॉलेजला जात होता बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या पेपर दिवशीच सकाळी विश्वजीतच्या वडिलांचे निधन झाले.
नातेवाईक व शेजारी यांनी विश्वजीतला बारावीचा पेपर देण्यात काही अडथळा येऊ नये म्हणून, संभाजी यांचा अंत्यसंस्कार लवकर उरकून घेतला व विश्वजीतला चिखली तालुका शिराळा येथे केंद्रावर परीक्षेसाठी घेऊन गेले. वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून विश्वजीतने जड अंतकरणाने बारावीचा पहिला पेपर दिला.