
no images were found
कणेरी मठाचा पुढाकाराने शिवजयंतीला कोल्हापुरात भव्य दिव्य शोभायात्रा
कोल्हापूर: श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात भव्य आणि दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचमहाभुतांची माहिती देण्याबरोबरच युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यावरणप्रेमी विचारांचा जागर या निमित्ताने करण्यात येणार आहे.
देशाच्या विविध प्रांतातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्ररथ, कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रजासत्ताकदिनी दिल्ली संचलनात सहभागी झालेले महाराष्ट्राचे चित्ररथ या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचा समारोप व पंचगंगा नदीची महाआरती होणार आहे. पर्यावरणजागृतीसाठी कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली रोज हजारो हात यासाठी राबत आहेत. २० फेब्रुवारी रोजी सकाळी या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. त्यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. मठाच्या पुढाकाराने शहरातील सर्व तरूण मंडळ, तालीम मंडळांच्या सहभागाने काढण्यात येणाऱ्या या शोभायात्रेची सुरूवात दसरा चौक येथून करण्यात येणार आहे. चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन करून ही शोभायात्रा सुरू होईल. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर आणि करवीरकर जनता सहभागी होईल.
अतिशय भव्य आणि दिव्य अशा वातावरणात निघणाऱ्या या शोभायात्रेत पंचमहाभुतांची माहिती देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यावरण आणि वैज्ञानिक विचारांचा जागर करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील संचलनामध्ये दुसरा क्रमांक मिळविलेले महाराष्ट्राचे चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे