no images were found
मार्च अखेर शेतीपंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या द्या : कार्यकारी संचालक भादीकर
कोल्हापूर : कोल्हापूर परिमंडळासाठी दिलेल्या निधीचा पुरेपूर वापर करून मार्च अखेर शेतीपंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्याचे काम पुर्ण करावे, अशा सुचना कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांनी कोल्हापूर येथील आढावा बैठकीत दिल्या.
महावितरणकडून शेतीपंपाच्या प्रलंबित वीज जोडण्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अग्रकम देण्यात आला आहे. त्याकरीता कृषी आकस्मिक निधीसह राज्य पातळीवर 1500 कोटी रुपये निधीची तरतुद करण्यात आली आहे.महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयात संपन्न झालेल्या आढावा बैठकीत याबाबत सुचना दिल्या.
शेतीपंप प्रलंबित वीज जोडणी, कृषी आकस्मिक निधीचा वापर, वीज देयक थकबाकी वसूली, नादुरुस्त रोहित्र बदलणे, मुख्यमंत्री सौरकृषी वाहीनी योजना, वीजहानी अधिक असलेले फीडर्स इ. विषयांच्या अनुषंगाने भादीकर यांनी सविस्तर आढावा घेतला.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतीपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्याचा प्रगतीचा आढावा घेऊन 31 मार्च 2023 अखेर निर्धारीत 2044 वीज जोडण्यांचे लक्ष्य पुर्ण करण्याच्या सुचना भादीकर यांनी दिल्या. शेतीपंपाची नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून देण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 5 वर्षापेक्षा अधिक काळ एकही वीज बिल न भरलेल्या 4887 शेतीपंप ग्राहकांच्या (74 कोटी थकबाकी) वीज बिल वसुलीचा आढावा घेऊन थकबाकी वसुलीच्या सुचना दिल्या. महावितरण ग्राहकांना दैनंदिन वीज खरेदी करुन पुरवठा करते. वीज बिलांच्या वसुलीतून वीज खरेदीचा खर्च भागविला जातो. तेंव्हा विविध वर्गवारीतील थकीत वीज बिलांची वसूली करून मार्च अखेरीस थकबाकी शुन्य करण्याचे निर्देश भादीकर यांनी दिले.
शेतीपंपांना दिवसा वीज मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री सौरकृषी वाहीनी योजना राबविली जात आहे. प्रथम टप्प्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 385 मेगावॅटचा शेती वीजवापर सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे कार्यान्वित करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून गतीने पुर्ण करावी, अशाही सुचना दिल्या. यावेळी मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, धर्मराज पेठकर यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.