no images were found
कबड्डीच्या मैदानातच खेळाडूचा अचानक मृत्यू
मुंबई : मलाड येथील महापालिकेच्या लव्ह गार्डनमध्ये कबड्डी सामने सुरू असताना 20 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. किर्तिकराज मल्लन असं या तरुणाचं नाव आहे.
गुरुवारी मित्तल कॉलेजच्या माध्यमातून मलाड पश्चिमेकडील महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिक दिंडोशी संतोष नगर परिसरात राहणारा आहे तो गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बीकॉम प्रथम वर्ष शिक्षण घेत होता.कार्तिकला मित्तल विद्यालयाच्या वतीने खेळण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कबड्डीची मॅच सुरू असतानाच कार्तिकराजचा मृत्यू झाला
आकाश कॉलेज विरुद्ध मित्तल कॉलेज दरम्यान कबड्डीचा सामना सुरू असताना कार्तिक खेळत होता. कार्तिक आकाश कॉलेजच्या खेळाडूंच्या खेम्यामध्ये डेडलाईन पार करून त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करत असताना समोरील खेळाडूंनी त्याला पकडलं.त्यावेळी तो बाद देखील झाला होता, मात्र माघारी फिरत असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांनी ताबडतोब मलाड पोलिसांना या घटनेची सूचना दिली. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कार्तिकला जवळील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.