no images were found
मंत्रिपदासाठी पाच आमदारांकडे मागितले100 कोटीं; आरोपींच्या चौकशीत खुलासा
मुंबई : मंत्रिपदासाठी 100 कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. मुख्य आरोपी रियाझ शेख याच्या सीडीआर तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. रियाज शेख हा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथील मूळ रहिवाशी आहे.
महाराष्ट्र सरकारमधील 100 कोटींचं कॅबिनेट मंत्रीपद प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीनं एकूण पाच आमदारांशी संपर्क साधला होता, अशी माहिती मिळत आहे. मुख्य आरोपीच्या सीडीआरमधून ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणात चौकशीतून असं समोर आलं होतं की, तुम्ही जर 100 कोटी रुपये दिले तर तुम्हाला महाराष्ट्रात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल. याप्रकरणी सात लोकांना अटक करण्यात आली होती.
अटक झाल्यानंतर या आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा सीडीआर काढण्यात आला. या सीडीआर मधून धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये राहुल कुल, समाधान अवताडे, सुभाष देशमुख, सुरेश दास आणि अतुल सावे या आमदारांशी मुख्य आरोपीनं संपर्क साधल्याचं समोर आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझने इतक्या आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्यानंतर या लोकांनी ही माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यानंतर सर्व आमदारांना त्याच्या जाळ्यात पडण्याचं नाटक करून ही माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आमदारांच्या मदतीनं आरोपींना अटक केली, असा दावाही सूत्रांनी केला आहे.
प्रकरण नेमकं काय?
गेल्या वर्षी महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर काही जणांनी 100 कोटींच्या बदल्यात कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी आमदार राहुल कुल यांनी पोलिसांना कळवून मंत्रिपद मिळवण्याचा दावा करणाऱ्यांना अटक करवून दिली होती. याच संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रियाझ शेख याच्या सीडीआरनुसार, त्याने अनेक आमदारांशी संपर्क साधला होता.
मुंबई गुन्हे शाखेच्या आरोपपत्रानुसार, आरोपी रियाझ शेखनं आमदार राहुल कुल, समाधान अवताडे, सुभाष देशमुख, सुरेश दास आणि अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला होता.
कोल्हापूरचा रियाज या कटाचा मुख्य सूत्रधार
अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील रियाज हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथील आहे. तोच या कटाचा मुख्य सूत्रधार होता. आता त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर गावी परतला. गावात आल्यानंतर एखाद्या कुस्तीचे मैदान मारुन आल्याप्रमाणे त्याने स्टंटबाजी केली. गल्लीत आल्यानंतर झालेल्या स्वागताचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावेळी रियाज शेखला जामीन मिळाल्याने फटाके उडवून फुले सुद्धा उधळण्यात आली.
रियाजचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले असून त्याला झटपट श्रीमंतीचा नाद लागला होता. सुरुवातीला व्हिडिओ सेंटरमध्ये काम केल्यानंतर केबल व्यवसायात उतरला. तेथून त्याने मोर्चा मायनिंगकडे वळवत बक्कळ पैसा कमवून अलीशान जीवन जगू लागला. या दरम्यान त्याचे राजकीय नेत्यांशी संबंध येऊ लागले. रियाजने मोठा डाव एका दमात साध्य करण्याच्या इराद्याने थेट आमदारांना गंडवण्याचा बेत रचला, पण त्याचा डाव अंगलट आल्याने जेलची हवा खावी लागली.