no images were found
ज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध
कोल्हापूर : ज्येष्ठ साहित्यिक व कवी ग.दि. माडगूळकर यांनीच ज्यांना आपले मानसपुत्र मानले, असे येथील प्राचीन वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक व कवी ना.वा. देशपांडे यांच्या ९०व्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाकडील त्यांची साहित्यसंपदा आजपासून वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि सुनंदा देशपांडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.कवीवर्य देशपांडे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी त्यांची समग्र साहित्यसंपदा गेल्या वर्षी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राकडे सुपूर्द केली. यामध्ये अनेक दुर्मिळ ग्रंथांचाही समावेश आहे. विद्यापीठाने या संग्रहाच्या नोंदणीचे काम पूर्ण करून आज देशपांडे यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त वाचकांसाठी हा संग्रह उपलब्ध केला. विद्यापीठाच्या अर्काईव्ह कक्षामध्ये स्वतंत्र कपाटामध्ये हे साधारण ४६८ ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. आज कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील, श्रीमती देशपांडे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पणाचा छोटेखानी कार्यक्रम झाला. ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक हृद्य व संस्मरणीय प्रसंग असून पतीला दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याचे समाधान वाटत आहे,’ अशा भावना सुनंदा देशपांडे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प तसेच ग्रंथदेणगी प्रदान प्रसंगीचे छायाचित्र भेट देऊन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, प्रा. शशिकांत चौधरी, उपग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर, सहायक ग्रंथपाल डॉ. एस.व्ही. थोरात, ए.बी. मातेकर, रविंद्र बचाटे, मदन मस्के, वसुधा वासुदेव लाटकर, स्मिता श्रीपाद देशपांडे, उषा अरविंद भिलवडीकर, अनामिका अनिल पाठक आदी उपस्थित होते.