no images were found
निलगायीची दुचाकीला धडक, शिक्षक ठार
हिंगोली : हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर देऊळगाव पाटीजवळ निलगायीने (रोही) दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. 13) सकाळी 9. 30 वाजता घडली. शेख तौसीफ अब्दूल कदीर (33) असे मृत शिक्षकाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी शिक्षकावर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले शेख तौफीक व त्यांचे सहकारी शेख फईम शेख रहीम हे दोघे त्यांच्या दुचाकी वाहनावर आज सकाळी साडेनऊ वाजता हिंगोलीकडून पुसेगावकडे शाळेसाठी जात होते. त्यांची दुचाकी देऊळगाव पाटीजवळ आली असताना अचानक बाजुच्या शेतातून आलेल्या निलगाय रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्न करीत होती. यातच तिची दुचाकीला जोरदार धडक बसली.
या अपघातामध्ये दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर परिसरातील नागरीकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलाून त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखळ केले. मात्र शेख तौसीफ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख फईम यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल मस्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.