no images were found
नेदरलँडमध्ये खजिन्याचा शोध सुरू; नाझी सैनिकांनी लपवलेल्या खजिन्याचा नकाशा जाहीर
ओमेरेन : लपवलेल्या खजिन्याचे सर्वांनाच आकर्षण असते आणि या खजिन्याबाबत जर एखादे कागदपत्र किंवा नकाशा उपलब्ध झाला तर या खजिनाचा शोधही सुरू होतो. सध्या नेदरलँडमधील एका छोट्या शहरामध्ये अशाच प्रकारे खजिन्याचा शोध सुरू झाला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये जर्मनीच्या नाझी सैनिकांनी ज्या ठिकाणी खजिना लपवला होता त्या ठिकाणचा संभाव्य नकाशा प्रसिद्ध करण्यात आल्याने आता सर्वच नागरिकांनी या खजिन्याचा शोध सुरू केला आहे.
नेदरलँडच्या डच नॅशनल पार्क या संस्थेने याबाबतचा नकाशा जाहीर केल्यानंतर ओमेरेन नावाच्या या छोट्याशा गावांमध्ये सर्वच नागरिकांनी खजिनाचा शोध सुरू केला आहे. मेटल डिटेक्टर कुदळ फावडी आणि खोदकाम करण्याची अनेक उपकरणे घेऊन नागरिकांनी ठीकठिकाणी हा खजिना शोधण्यास प्रारंभ केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये नाझी सैनिकांनी चार खोक्यांमध्ये हा खजिना लपवला होता. ज्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे दागिने आणि हिरे असावेत अशी शक्यता आहे.
ऑगस्ट 1944 मध्ये युद्धाच्या कालावधीमध्ये एका बँकेमध्ये स्फोट झाल्यानंतर नाझी सैनिकांनी ती बँक लुटली होती आणि त्या लुटीतून मिळालेले दागिने हिरे माणके आणि इतर मौल्यवान वस्तू चार खोक्यांमध्ये भरून लपवून ठेवल्या होत्या त्याबाबतचा संभाव्य नकाशा नॅशनल संस्थेने जाहीर केल्यानंतर आता ही गडबड सुरू झाली आहे. युध्दाच्या समाप्तीनंतर एका जर्मन सैनिकाकडून हा नकाशा उपलब्ध करण्यात आला होता.