no images were found
कपिलतीर्थातील स्वच्छतागृहाचा ठेका रद्द करण्याची स्थानिक दुकानदारांची मागणी
कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पर्यटक, दुकानदार, कर्मचारी आणि ग्राहक यांच्यासाठी एकमेव सोय असलेल्या कपिलतीर्थ मार्केट मधील स्वच्छतागृहाची दुर्दशा करणार्या आणि नियमबाह्य पैसे गोळा करणार्या ठेकेदाराचा ठेका तातडीने रद्द करावा, निधी मंजूर करून खराब झालेली सर्व शौचालये दुरुस्त करावीत आणि रद्द केलेला ठेका कपिलतीर्थ मार्केट व्यापारी असोसिएशनला चालविण्यासाठी द्यावा अशी मागणी शिष्ट मंडळाने
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचेकडे निवेदनाद्वारे केली.
कपिलतीर्थ मार्केटमधील महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय सध्या ‘पे अँन्ड यूज’ करारावर एका ठेकेदारास चालवावयास दिलेले आहे. गेली 5-6 वर्षे हा ठेकेदार फक्त पैसे घेवून व अरेरावी करून अतिशय वाईट परिस्थितीमध्ये हे शौचालय चालवत आहे. याबाबत महानगरपालिकेच्या अधिकार्यांकडे वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रारीही केल्या आहेत. परंतु ठेकेदाराच्या वागण्यात कोणताही बदल घडलेला नाही.
या शौचलयामध्ये कमीत कमी स्वच्छताही ठेवली जात नाही आहे. आजूबाजूच्या परिसरातून जाताना नगरिकांना व महिलांना अक्षरश: नाकाला रुमाल लावून जाण्याची पाळी येत आहे. या शौचालयातील बहुतेक फरश्या फुटलेल्या असून शौचलयांच्या दारांचीही अवस्था गंभीर आहे. महिला विभागाला पुरेसा आडोसा नसल्यामुळे महिलांची प्रचंड अडचण होत आहे. हात धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचीही उपलब्धता या ठेकेदाराने करून दिलेली नाही. येथील अस्वच्छतेमुळे आजूबाजूच्या दुकानदारांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. तसेच या ठिकाणी असणारा कर्मचारी वारंवार दारूच्या नशेत असतो. आणि महिलांनाही अरेरावीची भाषा वापरतो.हे शौचालय श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात येणारे अनेक भाविक वापरत असल्यामुळे इथल्या दुरावस्थेची चर्चा कोल्हापूर बाहेरही होवू लागली आहे.
त्यामुळे कपिलतीर्थ मार्केट मधील स्वच्छतागृहाची दुर्दशा करणार्या आणि नियमबाह्य पैसे गोळा करणार्या ठेकेदाराचा ठेका तातडीने रद्द करावा, निधी मंजूर करून खराब झालेली सर्व शौचालये दुरुस्त करावीत आणि रद्द केलेला ठेका कपिलतीर्थ मार्केट व्यापारी असोसिएशनला चालविण्यासाठी द्यावा
या मागण्या माजी नगरसेवक अजित ठाणेकर, भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप वीर, प्रमोद पाटील, ओंकार गोसावी, ऋतुराज नढाळे यांच्या शिष्टमंडळाने प्रशासकांकडे केली. यावेळी सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करू, शौचालयाचे बांधकाम लवकरात लवकर होईल. ठेकेदाराचा ठेका रद्द करणे बाबत प्रशासकीय स्तरावर बैठकीचे नियोजन करू अशी ग्वाही प्रशासकांनी दिली. यावेळी उपयुक्त रविकांत आडसूळ, डॉ.विजय पाटील, सचिन जाधव, निवास पवार, ऋषिकेश सरनाईक आधी अधिकारी उपस्थित होते .