no images were found
बजरंग दलाचा एका प्रमुख नेता, शिवसेना, काँग्रेसचे नेते किलिंगसाठी टार्गेट: दहशतवाद्यांची कबुली
नवी दिल्ली : पाकिस्तानातील हरकत उल अन्सार या दहशतवादी संघटनेनं भारतात प्रजासत्ताक दिनी मोठा कट रचला होता. ही संघटना २७ जानेवारीला बजरंग दलाच्या एका प्रमुख नेत्याची हत्या करणार होती. या शिवाय शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे नेतेही या संघटनेच्या निशाण्यावर होते. या टार्गेट किलिंगसाठी या संघटनेनं जहांगीरपुरी येथून अटक केलेल्या दहशतवाद्यांना कंत्राट दिलं होते. पहिलं टार्गेट पूर्ण केल्यावर या दहशतवाद्यांना संघटनेकडून ५० लाख रुपये मिळणार होते.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत दहशतवाद्यांनी कबूल केलं आहे की, या हत्यांच्या तयारीसाठी त्यांना पाच लाख रुपये आधीच मिळाले आहेत. ही रक्कम हवालाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचली आहे. दहशतवाद्यांनी सांगितलं की, एका तरुणाच्या हत्येचा व्हिडिओ संघटनेच्या हँडलरला पाठवल्यानंतर त्यांना हे काम मिळालं. दहशतवादी संघटनेनं ज्या नेत्यांना टार्गेट केले आहे त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळाली आहे. त्या आधारे त्यांनी संबंधित नेत्यांवर पाळत ठेवण्याचं कामही सुरू केलं होतं. प्लॅनची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा केली जात होती. दिल्ली स्पेशल सेलला मिळालेला व्हिडिओ दहशतवाद्यांनी डेमो म्हणून कॅनडामध्ये बसलेल्या हँडलरला पाठवला होता. एका तरुणाची हत्या केल्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या माध्यमातून या दहशतवाद्यांनी आपला हेतू भयंकर असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ३७ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांनी तरुणाच्या मृतदेहाचे आठ तुकडे केल्याचं दिसत आहे.
या दोन्ही दहशतवाद्यांना जहांगीरपुरी येथून अटक केली आहे. दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दिल्लीतील भालस्वा डेअरी येथील घरातून तरुणाचा मृतदेह आणि दोन हातबॉम्ब जप्त केले. तरुणाच्या मृतदेहाचे तीन तुकडे झाले आहेत, असा समज होता. मात्र, आरोपींनी मृतदेहाचे आठ तुकडे केल्याचं तपासात निष्पन्न झालं. या संपूर्ण घटनेचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी जोडला गेला असल्याचं निदर्शनास आलं आहे. पहिलं टार्गेट पूर्ण होताच त्यांना ५० लाख रुपये मिळणार होते. दुसरं आणि तिसरं टार्गेट पूर्ण झाल्यावर पुन्हा ५०-५० लाख रुपये मिळणार होते. या खुलाशानंतर पोलिसांनी दहशतवादी नेटवर्कसह हवाला नेटवर्कच्या मुळांचा शोध सुरू केला आहे.जहांगीर पुरी येथून पकडलेले दहशतवादी जगजीत आणि नौशाद यांनी पोलिस चौकशीत सांगितलं आहे की, २७ जानेवारीला बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येनंतर दुसरी हत्या ३१ जानेवारीला होणार होती. ३१ तारखेला काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याची हत्या होणार होती. हा नेता देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्यानंतर ही घटना घडणार होती. या टार्गेटच्या यशानंतर शिवसेनेच्या एका नेत्याला मारणं हे, तिसरं टार्गेट होतं. पुढील चौकशीसाठी न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.