
no images were found
एकाचवेळी दोन पदवी प्रवेशांत प्रमाणपत्रांअभावी अडचणी; उपाययोजना करण्याचे यूजीसीचे निर्देश
मुबई : आतापर्यंत विद्यार्थ्यांना दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण एकावेळी घेण्याची परवानगी नव्हती. मात्र यूजीसीने अलीकडेच नियमांत बदल करून एकाचवेळी दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम करण्यास मुभा दिली.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यास मुभा दिली आहे. मात्र उच्च शिक्षण संस्थाकडून विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी आग्रह धरण्यात येत असून, या प्रमाणपत्रांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी येत असल्याचे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता येण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश यूजीसीने विद्यापीठांना दिले.
आतापर्यंत विद्यार्थ्यांना दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण एकावेळी घेण्याची परवानगी नव्हती. पूर्णवेळ पदवीचे शिक्षण घेताना पदविका किंवा अर्धवेळ पदवीचे शिक्षण घेता येत होते. मात्र यूजीसीने अलीकडेच नियमांत बदल करून एकाचवेळी दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम करण्यास मुभा दिली. एकाच वेळी दोन पूर्णवेळाचे पदवी अभ्यासक्रम करताना एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष, तर दुसरा ऑनलाइन किंवा दूरस्थ असणे आवश्यक आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना यूजीसीने प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभतेने होण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश युजीसीने सप्टेंबरमध्ये देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना दिले होते.
या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थाकडून विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी आग्रह धरण्यात येत असून, या प्रमाणपत्रांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांचा उद्देश सफल होत नसल्याचे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता येण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश यांनी पुन्हा एकदा विद्यापीठांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले.