
no images were found
शुभम सिदनाळे; संदीप मोटे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पुढील फेरीत प्रवेश
कोल्हापूर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती गटात कोल्हापूरच्या शुभम सिदनाळे, सांगलीच्या संदीप मोटे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. कोल्हापूरच्याच अतुल चेचरने ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक, तर अन्य एका वजनी गटात सूरज अस्वलेने रौप्यपदक पटकावले.गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटीलला पुढे चाल मिळाली. गादी विभागात कोल्हापूरच्याच संग्राम पाटीलला पराभवाला सामोरे जावे लागले. कोल्हापूरच्या विजय पाटील यानेही पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत स्पर्धा सुरू आहे. माती विभागातील सिकंदर शेख व माऊली जमदाडे यांच्यात रात्री झालेल्या लढतीत सिकंदर शेख याने गुणावर विजय मिळवला. कोल्हापुरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिनी झालेल्या कुस्ती मैदानातही सिकंदर शेख विजयी ठरला होता. माऊली जमदाडेकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. वैशिष्ट्य असे की, दोन्ही मल्ल कोल्हापूरच्या शाहू विजयी गंगावेस तालमीचे विश्वास हारुगले यांचे पठ्ठे आहेत. दोन्हीही बुरुजबंद मल्लात चुरशीची लढत झाली. सिकंदर शेखने गुणावर विजय मिळवला.
दरम्यान, माती विभागात कोल्हापूरच्या शुभम सिदनाळे याने घिस्सा डावावर अप्पा सरगर याला अस्मान दाखवले. गतविजेत्या पृथ्वीराज पाटीलच्या लढतीकडेही सर्वांचे लक्ष होते. मात्र, त्याला पुढे चाल मिळाली. संग्राम पाटील यांच्याकडून आशा होत्या. मात्र, अक्षय शिंदे याच्याकडून त्याला पराभव पत्करावा लागला. २७ किलो वजनी गटात सूरज अस्वले याने दुसऱ्या फेरीत प्रवेश केल्याने त्याच्याही लढतीकडे लक्ष लागून राहिले. मात्र, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कोल्हापूरच्याच अतुल चेचर याला कांस्यपदक मिळाले. दरम्यान, संदीप मोटे याने माती गटात योगेश पवार याच्यावर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला.