no images were found
पन्हाळगडावर मुख्य रस्त्याशेजारी भूस्खलन
दगड कोसळू लागल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता
कोल्हापूर : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. अशातच पन्हाळगडावर जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरील चार दरवाजा येथील नवीन बांधकामाशेजारीच भूस्खलनाला सुरुवात झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पायथ्याशी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पन्हाळा गडावर जाणाऱ्या रस्त्यावर सातत्याने भूस्खलन होत आहे. गेल्यावर्षी चार दरवाजा जवळच भूस्खलन झाल्याने वर्षभर हा रस्ता बंद करण्यात आला होता. तेथे अत्याधुनिक पद्धतीने भिंत बांधत रस्ता तयार करण्यात आला. वर्षभर हे काम सुरू होते. त्यानंतर चार-पाच महिन्यांपूर्वीच वाहतुकीला सुरुवात झाली होती. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवीन बांधकाम केलेल्या रस्त्याच्या शेजारी भूस्खलन सुरू झाले. मोठ्या प्रमाणात माती व दगड खाली पडू लागल्याने पुन्हा एकदा या रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, चार दरवाज्याच्या पायथ्याशी काही घरे आहेत. भूस्खलनामुळे या घरांतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.