no images were found
ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन 14567 सुरु
कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी माहिती, मदत आणि तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन 14567 सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरिकांनी हेल्पलाईन 14567 ला कॉल करुन माहिती घ्यावी आणि आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन हेल्पलाईनचे क्षेत्रीय अधिकारी सागर कोगले यांनी केले आहे.
राष्ट्रीय हेल्पलाईनचा उददेश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाईन तयार करुन ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी सहकार्य. राष्ट्रीय हेल्पलाईन ही वयोवृद्ध व्यक्तींसाठी असून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फ़ौंडेशनद्वारे चालवली जात आहे. हेल्पलाइनचा टोल फ्री नंबर-14567 आहे. हेल्पलाइनची वेळ सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 8 वाजपर्यंत असून वर्षातील 365 पैकी 361 दिवस सुरु राहणार आहे.
हेल्पलाईनकडून मिळणाऱ्या सेवा :– माहिती- आरोग्य – जागरुकता, निदान, उपचार, निवारा / वृद्धाश्रम घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक इ. मार्गदर्शन- कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.), आर्थिक, पेन्शन संबंधित सरकारी योजना, भावनिक आधार देणे – चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्त ऐवजीकरण इ.) क्षेत्रीय पातळीवर मदत- बेघर, अत्याचार ग्रस्त वृद्ध, ज्येष्ठ हरवलेल्या व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केले आहेत, असेही श्री. कोगले यांनी कळविले आहे.