
no images were found
किमान आधारभुत किंमत खरेदी योजना : ऑनलाईन शेतकरी नोंदणीस 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीचे काम पाहते. हंगाम 2022-23 करीता शासनाचे एफ.ए.क्यू. प्रतीच्या धान (भात) करीता 2 हजार 40 व रागी (नाचणी) 3 हजार 578 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. आजपर्यंत काही कारणास्तव जे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करु शकले नाहीत त्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी 15 जानेवारी 2023 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी प्रथम या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणी करीता शेतकऱ्यांनी चालू हंगाम 2022-23 मधील धान (भात), नाचणी पिक लागवडीची ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे.
शेतकरी नोंदणीची मुदत 15 जानेवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी त्वरीत या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा व नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, शाहू मार्केट यार्ड येथे संपर्क करावा, असेही श्री. खाडे यांनी कळविले आहे.