
no images were found
जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये; संभाजीराजे छत्रपतींकडून अजित पवारांना सल्ला
कोल्हापूर : अजित पवार यांनी छत्रपती संभाजीमहाराजबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर संताप सुरु झाला आहे. स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांच्या भूमिकेला विरोध करताना कोणत्या आधारावर वक्तव्य केलं? अशी विचारणा केली आहे. जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये, असेही राजे म्हणाले. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर संभाजीराजे यांनी कोल्हापुरातून भूमिका स्पष्ट केली.
संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत हे नक्की आहे. संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केलं हे कुणी नाकारू शकत नाही. त्यामुळे संभाजी महाराज हे धर्मवीर होते. मी नेहमी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणून भाषणाची सुरुवात करतो यापुढे देखील करेन. संभाजीराजे पुढे म्हणाले, अजित पवार यांनी कोणता संदर्भ देऊन बोलले हे माहीत नाही. अभ्यास असल्याशिवाय कोणतंही वक्तव्य करू नये. त्यामुळे अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे. सभागृहात ज्यावेळी बोलताना अभ्यास करूनच बोलावे लागते. माझी सगळ्या पुढाऱ्यांना विनंती आहे की, इतिहासाबद्दल बोलताना इतिहास संशोधक यांच्याकडून माहिती घेऊन बोलले पाहिजे. संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवार यांना सल्ला दिला. जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये, धर्माचे रक्षक नव्हते हे बोलणं पूर्णपणे चुकीचे आहे. संभाजी महाराज केवळ धर्मवीर होते हे म्हणणारे देखील चुकीचे आहे.धर्मरक्षकाबरोबर स्वराज्यरक्षक देखील होते. अजित पवार यांनी पुण्यात होत असलेल्या संभाजीराजेंच्या स्मारकावर बोलावे.