
no images were found
नशामुक्त भारत अभियान कार्यशाळा संपन्न
व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना वाचवण्यासाठी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी योगदान देतील
कोल्हापूर : सध्या विविध कारणांमुळे समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना वाचवण्यासाठी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी निश्चित योगदान देतील, असा विश्वास ‘सायबर’ महाविद्यालयातील समाजकार्य विभागाचे प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी व्यक्त केला.
केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत ‘सायबर’ महाविद्यालयातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रा. दीपक भोसले म्हणाले, आयुष्य जगण्याच्या अनेक वाटा आहेत. परंतु ज्या वाटेने गेल्याने आयुष्याची वाट बिकट होईल, असा रस्ता न निवडता जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवण्यासाठी गरजूंना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची गरज आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, राज्यात दहा जिल्ह्यात हे अभियान सुरु आहे. विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त अभियान’ राबविण्यामागील उद्देश समजून घेऊन तो जिल्हाभर पोहोचवावा. अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य समीर देशपांडे म्हणाले, भारतात प्रत्येक वर्षाला साधारणपणे २४ हजार कोटी रुपयांचा तंबाखू विकला जात असून त्यामुळे होणाऱ्या आजारांवर शासनाचे २७ हजार कोटी रुपये खर्च होतात. या व्यसनांचा मोठा फटका गरीबांना बसत असून अशा घरातील महिला आणि मुलांना मोठी झळ बसते. अशी कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे.
अभियानाच्या राज्य समन्वयक अनुष्का गुप्ता, अन्नू मौर्य यांनी विविध माहितीपट, स्लाईड शो च्या माध्यमातून विविध व्यसनांचे प्रकार, परिणाम आणि नियंत्रणासाठीच्या उपाययोजना याबाबत विशेष मार्गदर्शन केले. यावेळी दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचा प्रारंभ झाला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी स्वागत केले. शिवानंद कोळी यांनी व्यसनमुक्तीचा पोवाडा सादर केला. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय समिती सदस्य प्रा. सुरेश आपटे यांनी आभार मानले. सदानंद बगाडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सूर्यकांत म्हात्रे, समाजकार्य विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.