
no images were found
महानगरपालिका क्षयरोग विभागास केंद्र स्तरावरुन सुवर्ण पदक नामांकन
कोल्हापूर : भारत सरकारने सन 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे महत्वकांक्षी धोरण ठरविले आहे.क्षयमुक्त भारत 2025 या मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्रशासन सब नॅशनल सर्टिफिकेशन उपक्रम राबवित आहे. याकरीता 2015 पासूनच्या क्षयरोग कामकाजाचा आढावा केंद्रस्तरावरुन घेण्यात आला आहे.
यामध्ये भारतातील विविध राज्यातील 21 जिल्ह्यांना नामांकन देण्यात आलेले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि शहर क्षयरोग केंद्र यांना सुवर्ण पदकासाठी नामांकन प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी 2025 पर्यंत राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. मायक्रोबॅक्टीरियम ट्युबरक्युलॉसिस या जंतुने माणसाच्या शरिरामध्ये प्रवेश केल्यामुळे क्षयरोग हा आजार होतो. क्षयरोग हा हवेव्दारे पसरणारा संसंर्गजन्य आजार आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध घटकांची पडताळणी करुन हे पदक बहाल करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये क्षयरोग विषयी सर्वेक्षण सुरु आहे. या सर्व्हेक्षणाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षण तपासणीमध्ये केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष विविध भागामध्ये भेट देत आहेत. याकरीता महानगरपालिका क्षयरोग विभाग आपल्या शहरात क्षयरोग निर्मूलनासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी आपल्याकडे सर्वेक्षणाकरीता आलेल्या सर्व्हेक्षण टीमला संपूर्ण खरी माहिती देऊन मोलाचे सहकार्य करुन कोल्हापूर, कोल्हापूर या उपक्रमाचे मानकरी व्हावे असे आवाहन उप-आयुक्त रविकांत आडसुळ यांनी केले आहे.
हे सुवर्ण पदक प्राप्त करण्यासाठी महानगरपालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. रुपाली दळवी, आरोग्य विभाग, क्षयरोग विभाग सज्ज आहे. तरी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, ड्रग्ज डिस्ट्रीब्युटर, किरकोळ औषध विक्रेते यांनीही या पडताळणी कामी महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन क्षयरोग विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.