no images were found
आयटीआय विद्यार्थ्यांना आता ४० ऐवजी ५०० रुपये विद्यावेतनाचा प्रस्ताव
राज्यातील हजारो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे. अनेक वर्षांपासून या विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. आता, यामध्ये वाढ होणार असून 500 रुपयांचे विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, सतिश चव्हाण, बाळाराम पाटील यांच्याक्डून सदर केला गेला. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना मागील अनेक वर्षांपासून दरमहा 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. वाढत्या महागाईच्या काळात हे विद्यावेतन अतिशय कमी आहे, असा मुद्या आमदारांनी उपस्थित केला. सरकारकडून या विद्यावेतनात वाढ करण्यात येणार का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. तर आता, विद्यार्थ्यांना ४० रूपयांऐवजी 500 रुपयांचे विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.