no images were found
सहा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
नाशिक : नाशिक येथील वेळुंजे (ता. त्रंबकेश्वर) गावात एका वस्तीवरील ६ वर्षीय बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी समजलेली माहिती अशी की, वेळुंजे गावातील दिवटे वस्तीवर एका सहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला, या हल्ल्यात त्या सहा वर्षीय चिमुकल्याचा (हरीश निवृत्ती दिवटे) मृत्यू झाला. गेल्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामीण परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून यापूर्वीही एका ८ वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.
वेळुंजे गावानजीक ४-५ घरे असलेल्या दिवटे वस्तीमध्ये संध्याकाळच्या सुमारास हा ६ वर्षीय बालक घराजवळ खेळत असताना अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला करून त्याला आपल्या जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला. या गोष्टीचा सुगावा स्थानिकांना लागताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळविले. वनविभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. २ तासाच्या प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले. सलग घडलेल्या या बिबट्याच्या हल्ला प्रकरणामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.